DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना बेड्या

सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ₹७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलिकनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व तीन मोबाईल असा एकूण सुमारे ₹७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकनगर, बॉम्बे बेकरीच्या मागील परिसरातील एका घरात २५ जुलैच्या सकाळी ११.३० ते २६ जुलैच्या पहाटे ४.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व तीन मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकृष्ण पाटील, ललित नारखेडे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे व मोतीलाल बोरसे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.

त्यानुसार मास्टर कॉलनी परिसरात सापळा रचून आदिल खान सादिक खान (वय ३०) व अरजान ऊर्फ दालचावल खान अक्रम खान (वय ३०, दोघे रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनी घरफोडीची कबुली दिली.

आरोपींकडून १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगळ तसेच विवो वाय-१२, विवो वाय-३५ आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल असा सुमारे ₹७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.