चाळीसगावातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयित आरोपीकडून ४० हजारांची रोकड जप्त
चाळीसगाव : शहरातील घरफोडी करून ८० हजार रुपये चोरल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, संशयित आरोपी नदीमशहा लियाकतशहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याबाबत दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान घराच्या मागील भिंतीच्या पत्र्यातून प्रवेश करून घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रुपये चोरीस गेले होते. हा प्रकार नदीमशहा लियाकतशहा व त्याच्यासोबतच्या इतर व्यक्तींनी केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून संशयित आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत नदीमशहा लियाकतशहा हा चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील विष्णू पार्क येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली ४० हजार रुपयांची रोकड ही चोरीच्या रकमेतून असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी सदर रक्कम जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील व भूषण शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.