डीपी आराखड्यात १० हजार कोटींचा आरक्षण घोटाळा?
स्थायी समितीत अरविंद देशमुख आक्रमक; मनोरंजन उद्यान, अग्निशमन केंद्र व अंबर झरा धरणाच्या आरक्षणावर सवाल
जळगाव : जळगाव शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) ठरावीक जमीनमालकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी काही खासगी भूखंडांवर आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली, तर सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या काही जागांवरील आरक्षणे हटवण्यात आली, असा गंभीर आरोप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख यांनी शुक्रवारी समितीच्या सभेत केला. या फेरबदलांना त्यांनी ‘रु10 हजार कोटींचा आरक्षण घोटाळा’ असे संबोधले. मेहरूणमधील मनोरंजन उद्यान, ई-बस डेपोचा विस्तार, अग्निशमन केंद्र आणि अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्यासाठी राखीव क्षेत्राचा दाखला देत त्यांनी प्रशासनाकडे लेखी खुलासा मागितला.
जे. के. पार्कची दुरवस्था असताना खासगी खदानीवर उद्यान का?
मेहरूणमध्ये महापालिकेच्या सुमारे 110 एकरांच्या परिसरात जे. के. पार्क आधीपासून अस्तित्वात आहे. त्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असताना शेजारच्या खासगी जागेवर नव्या मनोरंजन उद्यानाचे आरक्षण कशासाठी, असा सवाल देशमुख यांनी केला. उद्योजक श्रीराम खटोड यांचा नामोल्लेख करत, गट क्रमांक 424 मधील खटोड कुटुंबाच्या सुमारे 3.5 एकर जागेवर ‘अम्युझमेंट पार्क’ अर्थात मनोरंजन उद्यान प्रस्तावित करण्यामागे त्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.
या जागेवर सुमारे 26 ते 27 वर्षांपूर्वी खदान होती आणि काही ठिकाणी आजही सुमारे 50 फूट खोल खड्डे आहेत, असे देशमुख यांनी सांगितले. या भूखंडाची सुरक्षितता, उद्यानासाठीची उपयुक्तता आणि जागा विकसित करण्याचा खर्च तपासला का, अशी विचारणा त्यांनी केली. लगतच्या 110 एकरांपैकी सुमारे 60 एकर क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे असल्याचे सांगत, उर्वरित सुमारे 50 एकरांचा सध्याचा वापर आणि त्यातील टी.बी. सॅनिटोरियमच्या जागेचा तपशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
यापूर्वीच्या जमीन व्यवहारांशी संबंधित प्रकरणांत खटोड कुटुंबाने महापालिकेकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्याचा दावा देशमुख यांनी केला. अनुभवी वकिलांच्या माध्यमातून हे दावे त्यांनी ताकदीने लढवले आणि त्यांना यशही मिळाले, असे ते म्हणाले. पूर्वीच्या प्रकरणांचा अनुभव लक्षात घेऊन नव्या आरक्षणामुळे उद्भवू शकणारे दावे आणि महापालिकेवर पडणारा आर्थिक भार प्रशासनाने आधी तपासला का, असा सवाल त्यांनी केला.

महासभेत दाखवलेली दोन कागदपत्रे आणि भूसंपादनाचे गणित
मा.पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील जागेचा व्यवहार देशमुख यांनी महासभेत पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील जागेच्या व्यवहाराचे कागदपत्र दाखवले होते. त्या व्यवहाराचा संदर्भ देत त्यांनी मेहरूणमधील गट क्रमांक 424 च्या भूसंपादनाचा अंदाज मांडला. प्रस्तावित आरक्षणाचे क्षेत्र 14,000 चौरस मीटर, म्हणजे सुमारे 3.46 एकर, आणि दर रु1,95,000 प्रति चौरस मीटर धरल्यास जमिनीचे मूल्य रु273 कोटी होते. त्याला 2.5 चा गुणक लावल्यास संभाव्य मोबदला रु682.50 कोटी होतो.
या रकमेवर वार्षिक 9 टक्के दराने एका वर्षाचे व्याज रु61.425 कोटी, तर 15 टक्के दराने रु102.375 कोटी होते. मोबदला देण्यास विलंब झाला आणि 15 टक्के दर लागू झाला, तर महापालिकेला एका वर्षाच्या व्याजापोटीच सुमारे रु102.38 कोटी मोजावे लागतील का, असा सवाल देशमुख यांनी केला. सुमारे रु100 कोटींच्या निधीत जे. के. पार्कसह शहरातील इतर उद्याने विकसित करता येतील, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
भूसंपादनाचे गणनापत्रक बुलढाणा अर्बनशी संबंधित जागेचा व्यवहार
महासभेत दाखवलेले दुसरे कागदपत्र बुलढाणा अर्बनशी संबंधित जागेच्या व्यवहाराचे होते. त्या संदर्भाने मांडलेल्या गणनेत रु429.80 कोटी हे मूळ मूल्य गृहीत धरले आहे. त्याला 2.5 चा गुणक लावल्यास संभाव्य मोबदला रु1,074.50 कोटी होतो. या रकमेवर वार्षिक 9 टक्के दराने रु96.705 कोटी, तर 15 टक्के दराने रु161.175 कोटी इतके एका वर्षाचे व्याज होते.
दोन्ही गणनांतील संभाव्य मोबदल्यांची बेरीज रु1,757 कोटी होते. ही गृहीत मूल्यांवर आधारित गणना आहे. दुसऱ्या गणनेतील मूल्य नेमक्या कोणत्या प्रस्तावित भूखंडाशी संबंधित आहे, तसेच प्रत्यक्ष संपादनाचा प्रस्ताव असल्यास कोणता दर आणि गुणक लागू होईल, याचा अधिकृत तपशील प्रशासनाने द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.
ई-बस डेपो आणि पार्किंगच्या विस्तारासाठी खासगी भूखंड कशाला?
पीएम ई-बस सेवा योजनेतील 50 बसच्या डेपोसाठी मेहरूणच्या टी.बी. सॅनिटोरियम परिसरातील सर्व्हे क्रमांक 418 आणि 419 मधील जागा निश्चित करण्यात आली होती. डेपोच्या पूरक सुविधांसाठी लगतच्या सर्व्हे क्रमांक 421 मधील काही भागाचाही समावेश आहे
ई-बस सेवेसाठी परिसरात विद्युत सुविधा उभारण्यात आली आहे आणि लगत महापालिकेच्या ताब्यातील जागेचा पर्याय उपलब्ध आहे, असे सांगत देशमुख यांनी डेपो व पार्किंगच्या विस्तारासाठी खटोड कुटुंबाशी संबंधित आणखी एका खासगी भूखंडाचा विचार कोणत्या निकषांवर झाला, असा सवाल केला. विस्तारासाठी लागणारे क्षेत्र आणि खासगी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव असल्यास तिचा क्रमांक, क्षेत्रफळ व संभाव्य मोबदला जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
वर्षभर पाणी, शेजारी क्रीडा संकुल. तरी अग्निशमन केंद्राचे आरक्षण का हटवले?
मेहरूण तलावालगतच्या गट क्रमांक 386 मधील जागा मागील विकास आराखड्यात महापालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी राखीव होती. हे आरक्षण नव्या प्रारूपातून वगळण्यात आल्याचा आक्षेप देशमुख यांनी घेतला. तलावालगत वर्षभर पाणी उपलब्ध आहे आणि शेजारीच विभागीय क्रीडा संकुल उभारले जात आहे. अशा ठिकाणी अग्निशमन केंद्रासाठी आधीच निश्चित केलेली जागा आरक्षणमुक्त करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, असा सवाल त्यांनी केला.
या बदलामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याचा संशय व्यक्त करत, आरक्षण वगळण्याचा प्रस्ताव कोणी दिला, त्याला कोणत्या अहवालाचा आधार होता आणि अग्निशमन केंद्रासाठी पर्यायी जागा निश्चित केली आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. गट क्रमांक 386 चे जुने व नवे नकाशे, बदलाची लेखी कारणे आणि निर्णयाची संपूर्ण फाईल सभागृहासमोर ठेवण्याची मागणी त्यांनी केली.
खेळाची मैदाने, उद्याने आणि नागरी सुविधांची आरक्षणे हटवून कोणाला लाभ?
शहरातील काही खेळाची मैदाने, उद्याने आणि महत्त्वाच्या नागरी सुविधांसाठी राखीव असलेल्या जागांवरील आरक्षणे वगळून संबंधित जमीनमालकांना कोट्यवधी रुपयांचा अप्रत्यक्ष लाभ करून दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला. हे बदल कोणी सुचवले, कोणाच्या शिफारशीवर करण्यात आले आणि त्यासाठी कोणती कारणे नोंदवली, याचा गटनिहाय तपशील त्यांनी मागितला.
अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्यासाठी राखीव क्षेत्र घटवल्याचा आरोप
अंबर झरा धरणाच्या पाणीसाठ्याशी संबंधित गट क्रमांक 174, 179 आणि 180 मधील पूर्वी राखीव असलेल्या क्षेत्राचा मोठा भाग नव्या प्रारूपातून वगळण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला. प्रत्येक गटात पूर्वी किती क्षेत्र राखीव होते, त्यापैकी किती कायम ठेवले आणि किती वगळले, हे दोन्ही आराखड्यांच्या तुलनात्मक नकाशांवर दाखवावे. या बदलाचा धरणाच्या पाणीसाठ्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा तांत्रिक अहवालही सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.प्रारूपातील फेरबदलांमुळे महापालिकेवर पडणाऱ्या संभाव्य आर्थिक भाराची माहिती स्थायी समितीला आधी का देण्यात आली नाही, असा सवाल देशमुख यांनी केला. खासगी भूखंडांच्या निवडीचे निकष, हरकतींवरील निर्णय आणि भूसंपादनाचा अंदाज सभागृहासमोर ठेवावा. सार्वजनिक आरक्षणे वगळण्याच्या निर्णयांची चौकशी करून लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक म्हणून 5 वर्षे प्रामाणिकपणे काम करणार आणि नागरिकांच्या सुविधा व महापालिकेच्या निधीवर परिणाम करणाऱ्या निर्णयांचा हिशेब मागत राहणार, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.