DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव ७ जानेवारीपासून

चार दिवस राष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची मांदियाळी; जळगावकर रसिकांना अभिजात संगीताची पर्वणी

जळगाव : भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा २५ वा अर्थात रौप्य महोत्सवी सोहळा ७ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत रंगणार आहे.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे मुख्य प्रायोजक असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि. तसेच चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य लाभणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात ७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर होईल. पहिल्या सत्रात पुण्यात वास्तव्यास असलेल्या प्रतिभासंपन्न गायिका पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर लिलाधर चक्रदेव आणि तबल्यावर आशय कुलकर्णी साथ देतील. दुसऱ्या सत्रात जागतिक कीर्तीच्या कथक गुरू पंडिता शमाताई भाटे यांच्या शिष्य प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले हे ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत.

८ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात झी टीव्हीवरील हिंदी सारेगमप रिअॅलिटी शोमध्ये सहभागी असलेले सहेजदीप सिंग यांचे गझल व ठुमरी गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अमनदीप सिंग आणि दिलरुब्यावर अंशदीप सिंग साथ देतील. दुसऱ्या सत्रात बनारसचे प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा कथन नृत्य सादर करणार आहेत. त्यांना पखावजवर गुरू व पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा, तबला व पढंतवर उदयशंकर मिश्रा आणि सारंगीवर ओम सहाई मिश्रा साथ देतील.

९ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात मध्य प्रदेश सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या उपसंचालक पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या गायन परंपरेतील भारती राजपूत या कुमारजींच्या अनवट बंदिशी आणि निर्गुणी भजने सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर निशांत शर्मा आणि संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ देतील. तिसऱ्या सत्रात पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखावज जुगलबंदी रंगणार असून, संवादिनीवर पं. अजय जोगळेकर साथसंगत करतील.

१० जानेवारी रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी पहिल्या सत्रात स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली यांचा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. कार्यक्रमाचे निरूपण प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर करतील.

नवीन पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी आणि त्यांना भारतीय संगीत परंपरेची ओळख व्हावी, यासाठी प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने खास जेन-झी पिढीसाठी अभिजीत पोहनकर आणि सहकारी ‘बॉलीवुड घराना’ हा सुश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.

तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या पिढीनेही अनुभवावा असा हा स्वरमहोत्सव असून, चारही दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रौप्य महोत्सवी संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व महोत्सवाच्या प्रायोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवासाठी प्रवेशिका मिळविण्याकरिता सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२३०७७२७७ / २२२७७२२ वर संपर्क साधावा. कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी विनंती प्रतिष्ठानाने केली आहे.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.