जळगावच्या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक
मनपा प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
जळगाव : जळगाव शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगरच्या वतीने गुरुवारी (२० ऑगस्ट) महापालिका आयुक्त व महापौर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास घोषणाबाजी करत मनपा प्रशासन व भाजपा सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, स्वच्छता, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा प्रश्न, शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे तसेच मेहरुण शिवारातील स्मशानभूमीच्या विकासासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
शहरात पाणीपुरवठा वेळेवर व पूर्ण दाबाने होत नसल्याचा आरोप पक्षाने केला. अनेकदा रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जात असून काही भागांत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांना विद्युत पंपाचा वापर करावा लागत आहे. नागरिकांना पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा पुढे ढकलला जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अशा परिस्थितीत वॉटर मीटर बसवून पाणीपट्टी वसुली करण्यापूर्वी मनपा प्रशासन २४ तास सुरळीत पाणीपुरवठा करण्यास सक्षम आहे का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. प्रत्येक प्रभागात दहा लाख रुपयांची कामे देण्यात आली असतानाही काही मक्तेदार कामे करण्यास तयार नसल्याचा आरोप पक्षाने केला. आयुक्तांनी बैठकीसाठी बोलावूनही संबंधित मक्तेदार उपस्थित राहत नसतील, तर अशा मक्तेदारांकडून कामे काढून घेऊन अन्य मक्तेदारांकडून तातडीने कामे करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
महामार्गावरील अनेक पथदिवे बंद असून ते दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. अजिंठा चौफुली ते विमानतळ परिसरापर्यंत सौरऊर्जेवरील पथदिवे बसविण्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले असतानाही अद्याप ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कचरा उचलण्यास विलंब होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे पक्षाने म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिक तसेच लहान मुलांना कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना वाढत असल्याचा दावा करण्यात आला. संबंधित मक्तेदार काम करण्यास असमर्थ असल्यास नवीन मक्तेदाराची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवाजीनगर उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी लोखंडी जिना उभारण्याची मागणी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाने केला. हा जिना तातडीने उभारून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.
मेहरुण शिवारातील उद्यानातील स्मशानभूमीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे पक्षाने निवेदनात म्हटले असून स्मशानभूमीत मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
वरील सर्व प्रश्नांवर पंधरा दिवसांत ठोस कार्यवाही करून जळगाव शहरवासीयांचे हाल थांबवावेत; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या गेटला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी दिला.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, माजी अध्यक्ष रिंकू चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, प्रा. जयप्रकाश महाडिक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, गणेश पाटील, सुहास चौधरी, आकाश हिवाळे, चेतन पवार, अकबर खान पैलवान, नईम खाटीक, विशाल देशमुख, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, गणेश हाटकर, कुणाल हाटकर, राहुल टोके, स्नेहा भिलारे, रजना सोनवणे, वझला तायडे, लक्ष्मी सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.