DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

जळगाव : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष… अशा अनोख्या संगमातून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड), जळगाव येथे रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युवतींच्या दहिहंडी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची भेट घेतली. दहिहंडी उत्सव समितीच्या नियोजना विषयी या बैठकीत चर्चा झाली.

जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीप्रसंगी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, कार्याध्यक्षा डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव प्रा. क्षमा सराफ, खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, मिनल जैन, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. दहिहंडीचा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला आणि उत्साहाला दाद द्यावी, असे आवाहन भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

१५ संघामधून ६८५ महिला गोविंदा सहभाग

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात ‘नारीशक्तीचा गजर, दहीहंडीचा थरार’ ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शाळा-महाविद्यालयांच्या १५ संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार जळगावकरांना अनुभवता येतील. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे.

६३ हजाराची रोख पारितोषिके

मागील वर्षीच्या दहिहंडीच्या समारोपी वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी रोख पारितोषिके देण्याचे जाहिर केले होते. त्याची पूर्तता म्हणून यंदाच्या दहिहंडी फोडणाऱ्या युवतींना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला ३११११ रूपये, द्वितीय संघाला २११११ रूपये, तृतीय संघाला १११११ रूपये असे एकूण ६३३३३ रूपयांची रोख पारितोषिके असतील.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. .

दहीहंडीच्या थरारासोबतच कार्यक्रमात विविध आकर्षणांची रेलचेल असेल. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरण निर्मिती करतील. यासोबतच मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. शहरातील १५ रिल्स स्टार युवतीही दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होणार असून, त्यांच्या सहभागामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे

नारीशक्तीला ऊर्जादायी साथ – अशोक जैन

‘महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी’ अशी ओळख निर्माण केलेल्या युवतींच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. पारंपरिक सण-उत्सवांमध्ये युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस आणि निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. अनेक क्षेत्रात महिलांनी आपल्या संस्कृतीची शान वाढवली आहे, अशी प्रतिक्रिया उत्सव समितीच्या बैठकीवेळी अशोक जैन यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.