जळगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
एलसीबी-म.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व एम.आय.डी.सी. पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १ किलो ९६३ ग्रॅम एफेड्रिन, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आणि एक काळ्या रंगाची बर्गमन मोपेडचा समावेश आहे. या प्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एम.आय.डी.सी. परिसरातील नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर एका व्यक्तीकडून एफेड्रिन या पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे यांना कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या कायदेशीर परवानगीने तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे व पंचांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११.४० वाजता दर्ग्यासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी काळ्या रंगाच्या बर्गमन मोपेडवरून नूर मोहम्मद पटेल येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
मोपेडच्या डिक्कीची पंचांसमक्ष झडती घेतली असता १ किलो ९६३ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त एफेड्रिन पावडर, अंदाजे किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये, तसेच २ किलो ११४ ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये आढळून आला. याशिवाय ३० हजार रुपये किमतीची बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली. असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त केलेला पांढऱ्या रंगाचा रासायनिक पदार्थ एफेड्रिन आणि दुसरा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एफेड्रिनचा वापर काही ठिकाणी एमडीसारख्या अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी तसेच वजन कमी करण्यासाठी व अधिक काळ जागरूक राहण्यासाठी केला जात असल्याचे आरोपीने सांगितले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक प्रभाकर जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ९(अ), २५(अ), ८(क) सह २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, दीपक जगदाळे, संतोष पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी, फॉरेन्सिक पथक, पंच, प्रमाणित वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांनी सहभाग घेतला.