DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जेबीसीएल हंगाम-३ मध्ये आयटी डिजिटेक सोल्युशन्सचा दिमाखदार विजय

झॅक भुसावळ उपविजेता; रॉयल मोबाईलला तृतीय क्रमांक

जळगाव : जळगाव बॉक्स क्रिकेट लीगच्या हंगाम-३ स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अंतिम सामन्यात आयटी डिजिटेक सोल्युशन्स संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. संघमालक अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार मिहिर अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आयटी डिजिटेक सोल्युशन्स संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघाला २५ हजार ५५५ रुपये रोख आणि इलेक्ट्रिक स्कूटी देऊन गौरविण्यात आले. झॅक भुसावळ संघाने उपविजेतेपद मिळवले. संघमालक एम. डी. झाहिद आणि कर्णधार मयूर कोळी यांच्या नेतृत्वाखाली संघाने प्रभावी कामगिरी केली. उपविजेत्या संघाला १५ हजार ५५५ रुपये रोख व दूरदर्शन संच देण्यात आला. रॉयल मोबाईल संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संघमालक शिबान बागवान आणि कर्णधार आयुष मदानी यांच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. तृतीय क्रमांकाच्या संघाला ७ हजार ५५५ रुपये रोख व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कारांचेही वितरण
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मयूर कोळी यांना मालिकावीर, शाहरुख पटेल यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज, लक्ष विश्राणी यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर साहिल पाटील यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामन्यावेळी संघमालक, प्रायोजक, खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्रायोजक, संघमालक, खेळाडू, आयोजक आणि मान्यवरांचे सहकार्य लाभले. खेळाडूंचा उत्साह, क्रीडाभावना आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे जेबीसीएल हंगाम-३ स्पर्धा संस्मरणीय ठरली, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.