सुनसगावात मोटार केबल चोरीचा पर्दाफाश; आठ जण पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : सुनसगाव येथे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीसह शेतातील विहिरीवरील मोटारींच्या केबल वायर चोरीचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी पंकज नथ्थू पाटील हे वाघूर नदीपात्रातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता काही इसम मोटारीची केबल वायर चोरी करताना दिसले. त्यांनी गावातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर ईश्वर अंकुश पाटील व मनोज कुंभार यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारींच्याही केबल चोरीला गेल्याचे समोर आले. नागरिकांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोटे, रोशन रमेश सपकाळे, मनोज धर्मराज पवार, प्रेम गणेश सोनवणे (सर्व रा. सुनसगाव), तसेच अजीज आझाद खाटीक व हर्षल शरीफ खाटीक (दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १० किलो वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची तांब्याची तार आणि ८० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली, असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ईश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे यांच्यासह पोलिस पथकाने केली.