DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात स्पावर पोलिसांचा छापा; ६ महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा

मसाज सेंटरच्या आडून कथित गैरप्रकार; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी केली कारवाई

जळगाव : शहरातील रिंगरोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली कथित गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत सहा तरुणींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिंगरोड परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी दामिनी पथकाने काही दिवस संबंधित ठिकाणी लक्ष ठेवले. त्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून माहिती घेऊन कारवाईपूर्वी आवश्यक पुरावे संकलित केले. गैरप्रकाराचे चित्रीकरण झाल्यानंतर पथकाने अचानक स्पावर धाड टाकली.

छाप्यादरम्यान स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, मणिपूरमधील तामेंगलोंग, पूर्व सिक्कीम तसेच नेपाळमधील बांके येथील तरुणींचा समावेश आहे. या तरुणी मसाज थेरपिस्ट म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये नेपाळमधील एका तरुणीचा समावेश असल्याने तिच्या पासपोर्ट व व्हिसासह भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. तिचा भारतातील प्रवेश कायदेशीररीत्या झाला आहे की नाही, याचीही पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणात नीरज सिंग पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) हा स्पाचा चालक व परवानाधारक, तर राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हा जागा मालक व परवानादाता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दामिनी पथकाची महत्त्वाची भूमिका

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने ही कारवाई केली. महिला पोलीस हवालदार वैशाली किशोर माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनु उत्तम घुले, अंजली नवलसिंग राजपूत, रीना महाजन, आरसीपी जवान ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील आणि अतीन संतोष थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.

जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, प्रोबेशनरी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व सहायक पोलीस उपनिरीक्षक भूषण कोल्हे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी कारवाईत सहकार्य केले.

पोलीस हवालदार दीपक पाटील, किरण धनगर, मनीषा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल राखी खाटिक, पोलीस हवालदार महेश महाजन, महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लाड, समाधान पाटील आणि प्रवीण जाधव यांचाही पथकात सहभाग होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.