DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चोरीची पल्सर विक्रीला काढली अन् पोलिसांच्या हाती लागली!

कांताई नाट्यगृहाजवळ जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; दोघे ताब्यात, शनीपेठेतील चोरीचा गुन्हा उघड

जळगाव : चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. कांताई नाट्यगृह परिसरात पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ताब्यातील मोटारसायकल शनीपेठ पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार किरण पंढरीनाथ वानवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रविण राजेंद्र जाधव हे जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कांताई नाट्यगृह परिसरात दोन व्यक्ती विनाक्रमांकाची पल्सर मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोघांना थांबविले. मोटारसायकलची कागदपत्रे आणि मालकी हक्काबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती देता आली नाही. चौकशीत त्यांनी मनोज दत्तू चौधरी (वय २४, रा. ज्ञानदेव नगर परिसर, जुना खेडी रोड, जमुना नगर, जळगाव) आणि सुमित शंकर चौधरी (वय ३१, रा. श्रीराम चौक, हरिओम नगर, जळगाव) अशी नावे सांगितली.

वाहन क्रमांकावरून चोरीचा उलगडा
पोलिसांनी मोटारसायकलचा चेसीस क्रमांक MB2368BX0NWC18568 आणि इंजिन क्रमांक DHXWNC58066 यांच्या आधारे आरटीओ अॅपवर वाहनाची माहिती तपासली. त्यावेळी सदर मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक MH-19-DY-7458 असल्याचे समोर आले. नंतर वाहनमालकाशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, ही मोटारसायकल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८९/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन्ही संशयितांसह जप्त मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

नागरिकांनी वाहन खरेदीपूर्वी पडताळणी करण्याचे आवाहन
अनोळखी व्यक्तींकडून कमी किमतीत किंवा संशयास्पद पद्धतीने वाहन खरेदी करताना नागरिकांनी वाहनाची कागदपत्रे, नोंदणी क्रमांक, चेसीस क्रमांक आणि मालकी हक्काची खातरजमा करावी. चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री अथवा संशयास्पद वाहनाबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार किरण पंढरीनाथ वानवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रविण राजेंद्र जाधव यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.