DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची करडी नजर

जिल्ह्यात ३८ ‘नॉईज लेव्हल मीटर’; नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

जळगाव : आगामी सण, उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाणे व अंमलदारांना एकूण ३८ ‘नॉईज लेव्हल मीटर’ उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे ध्वनीची पातळी तपासली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ध्वनी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदारांना ध्वनी मापक यंत्रांचा वापर करून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींची तत्काळ दखल घेऊन नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार दिवसाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० आणि रात्रीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ अशी निर्धारित करण्यात आली आहे. परिसराच्या वर्गीकरणानुसार औद्योगिक, व्यावसायिक, निवासी व शांतता क्षेत्रासाठी ध्वनीची कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. लाउडस्पीकर अथवा ध्वनीवर्धक यंत्रांचा वापर नियमांचे उल्लंघन करून केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते. तसेच दंडाचीही तरतूद आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सण-उत्सव आनंदात साजरे करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डीजे, लाउडस्पीकर, वाहनांचे हॉर्न, फटाके तसेच अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांचा अनावश्यक व मोठ्या आवाजात वापर टाळावा. मोठ्या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच प्राणी-पक्ष्यांना त्रास होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘सण उत्साहात साजरा करा; मात्र दुसऱ्यांच्या शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या. आवाज कमी करा, शांतता ठेवा,’ असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.