DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘युवॉल्यूशन 2K26’मधून नव्या नेतृत्वाची हाक

युवा भारत फोरमचा उपक्रम; १,२५० तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव  : युवा भारत फोरम, जळगाव शहराच्या वतीने ‘युवॉल्यूशन – Youth Conclave 2K26’ या युवा संमेलनाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. ‘From Legacy to Leadership’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विचार, कृती आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देण्यात आला.

या संमेलनासाठी ऑनलाइन ७९१, तर ऑन-स्पॉट २७२ अशा एकूण १,१६५ नोंदणी झाल्या. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुमारे १,२५० जणांची उपस्थिती होती. १६ महाविद्यालयांचा सहभाग असून, सहभागींपैकी ३५ टक्के तरुणी व ६५ टक्के तरुण होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी १२४ स्वयंसेवकांनी योगदान दिले.

संमेलनात ‘खजिना शोध’, ‘बिझनेस प्लॅन’, ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ आणि ‘फोक नाद’ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जळगावमध्ये विकसित करण्यात आलेला ‘आर्या’ मेड इन इंडिया रोबोट हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी ‘बांबू इंडिया’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश शिंदे यांचे विशेष पॉडकास्ट सत्र झाले. तसेच राष्ट्रीय सेवा भारतीचे अखिल भारतीय प्रमुख विजयराव पुराणिक यांनी मुख्य मार्गदर्शन सत्रातून तरुणांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव महापालिका आयुक्त आदित्य जिवने, योगेश शिंदे, जळगाव शहराचे संघचालक उज्ज्वल जी. चौधरी आणि विजयराव पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘नवे विचार, नवे नेतृत्व, नवा भारत!’ या संदेशाने संमेलनाचा समारोप करण्यात आला. युवा पिढीमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.