गोदावरीच्या ‘टीम अॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक
‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत दोन हजारांचे पारितोषिक; युवा नवोन्मेषकांच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘टीम अॅपेक्सइनोव्हेटर्स’ ने ‘द नेक्स्ट बिलियन-बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’मध्ये तृतीय क्रमांक पटकावत दोन हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
‘युवायव्होल्यूशन युवा संमेलन – युवा भारत : वारशापासून नेतृत्वापर्यंत’ या उपक्रमांतर्गत ६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ही स्पर्धा झाली. युवा नवोन्मेषक व उद्योजकांना व्यावसायिक कल्पना मांडण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. ‘टीम अॅपेक्सइनोव्हेटर्स’मध्ये प्रतीक वारके, शेख अल्तमाश, गौरव इंगळे आणि जिज्ञासा पाटील यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचार, टीमवर्क, उद्योजकीय दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत आपली व्यावसायिक संकल्पना प्रभावीपणे सादर केली.
या यशाबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या नवोपक्रम व उद्योजकता क्षेत्रातील उपक्रमांना बळ मिळाले आहे.
