DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

महाराष्ट्रातील ११० विद्यार्थ्यांचा सहभाग; सामाजिक प्रश्नांवर प्रभावी विचारमंथन

वाकोद, ता. जामनेर : विचारांना व्यासपीठ आणि वक्तृत्वाला दिशा देणाऱ्या श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती वाकोद येथे उत्साहात झाली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय व समकालीन विषयांवर प्रभावी विचार मांडले.

शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी निशा जैन होत्या. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य एस. टी. चिंचोले यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची भूमिका व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील अशा उपक्रमांचे महत्त्व सांगितले.

स्पर्धेत शिक्षण, पर्यावरण, प्रामाणिकपणा, गुड टच-बॅड टच, पेपरफुटी आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. पाठांतराऐवजी विषय समजून घेत स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यंदापासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक सुरू करण्यात आले.

‘प्रत्येक सहभागी विद्यार्थी विजेता’
निशा जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमधून निवड होऊन येथे सहभागी होणे हीच मोठी उपलब्धी आहे. केवळ क्रमांक मिळविणारेच नव्हे, तर सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी विजेता आहे,” असे सांगितले. वक्तृत्वातून मांडलेले विचार आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संस्थेच्या सचिवांनी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्याला उजाळा देत ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामागील त्यांची दूरदृष्टी अधोरेखित केली.

स्पर्धेचा निकाल : बालगटात नीरज दीपकसिंग राजपूत (वाकोद) प्रथम, हर्षल भारत धनगर (चोपडा) द्वितीय, तर शाश्वत मिलिंद पाटील (चाळीसगाव) तृतीय आला. किशोर गटात नीरज दीपक वारंगणे (जामनेर) प्रथम, अनुषा संदीप अहिरे (चाळीसगाव) द्वितीय, तर कार्तिक रामदास पाटील तृतीय आला. कुमार गटात प्रशांत रवींद्र पाटील (जामनेर) प्रथम, दुर्गेश समाधान लोहार (वाकोद) व अश्विनी गुरुदास मोरे (चोपडा) द्वितीय, तर राजवीर कैलास मोरे (कसमपुरा) तृतीय आले. भाग्यश्री ज्ञानेश्वर शिंदे (जि. प. शाळा, देवपिंपरी) हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सचिव सागरमलजी जैन, सहसचिव यू. यू. पाटील, परीक्षक ज्ञानेश्वर शेंडे, किशोर कुलकर्णी, रामचंद्र पाटील, डॉ. शरद दुगड, प्राचार्य रूपाली वाघ, प्राचार्य देवेंद्र चौधरी, विनोदसिंह राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, सुरेश जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले, तर आभार स्पर्धाप्रमुख प्रा. नितीन पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.