DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा पंकज महाजन यांच्या खांद्यावर

पाच वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण; नगरपरिषद आवारातच कापले केस

नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडींना बुधवारी नवे वळण मिळाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील हे वैयक्तिक कारणास्तव ७५ दिवसांच्या रजेवर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पंकज महाजन यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. पदग्रहण सोहळ्यामुळे नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते पंकज महाजन यांनी पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या संकल्पाची पूर्तता. सन २०२१ मध्ये नगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळेपर्यंत केस न कापण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यानंतर वाढविलेले केस प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरपरिषद आवारातच कापून संकल्प पूर्ण केला. यावेळी त्यांच्या पत्नी लीना महाजन यांनी जाऊळ झेलले. संकल्पपूर्ती होताच समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.

पदग्रहण सोहळ्यास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदग्रहणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकज महाजन म्हणाले, “आज मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. यापुढील माझे जीवन नशिराबादसाठी समर्पित असेल. नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वप्नातील नशिराबाद घडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे.” दरम्यान, समर्थकांनी नगरपरिषद परिसराची आकर्षक सजावट केल्याने सोहळ्याला उत्सवी स्वरूप आले होते. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पंकज महाजन यांच्यावर शहरातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी आली असून, त्यांच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.