जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अनावरण; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांना निमंत्रण
जळगाव :
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात दिवंगत अजित पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुतळ्याचे विधिवत अनावरण करण्यात येणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात आलेल्या या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च आला आहे. हा खर्च बँकेच्या नफ्यातून करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ७ फूट असून, त्याचे वजन तब्बल ५०० किलो आहे. नाशिक येथील प्रसिद्ध मूर्तिकार गर्गे यांनी हा पुतळा साकारला आहे.
पुतळा अनावरण सोहळ्यासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित राहण्यास होकार दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार तसेच जिल्हा बँकेचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये तसेच सहकार चळवळीच्या विकासात दिवंगत अजित पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत असल्याचे अध्यक्ष संजय पवार यांनी स्पष्ट केले.