“वसंत स्मृती” आता केवळ आठवणीत !
गेल्या तीस वर्षापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे भावनिक नाते ज्या वास्तूशी जूळलेले आहे असे, जळगाव च्या बळीराम पेठेतील भारतीय जनता पक्षाचे हे जिल्हा कार्यालय – “वसंत स्मृती”,
100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून उभी असलेली, कधी काळी लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली पण आता जीर्ण झालेली ही वास्तू नूतनीकरणासाठी पाडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यात त्याच जागेवर नव्याने भाजपा च्या कार्यालयाची नवी इमारत उभारण्यात येईलही पण वसंत स्मृती च्या “स्मृती” माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहेत.
फार पूर्वी तत्कालीन जनसंघाचे कार्यालय बळीरामपेठेतील बळीराम मंदिराजवळील चांदोरकरांच्या वाड्यात 12 बाय 25 च्या एका खोलीत होते !
1980 पासून त्यांच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय सुरु झाले. अधूनमधून जमिन शेणाने सारवावी लागे. ती जागा कार्यालय म्हणून खरं तर अत्यंत गैरसोयीची होती पण निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर भावनिक ओलावा टिकून होता.
1991 ला डॉ गूणवंतराव सरोदे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 243 बळीराम पेठ या ठिकाणी, तहसिल कार्यालया समोरील गल्लीत एका “बिन भाड्याच्या” 3 खोल्यांच्या जागेत खासदार सरोदे यांचे संपर्क कार्यालय व भाजप चे जिल्हा कार्यालय सुरू झाले. बडोदा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सूशिलाबाई गोडगस्ते यांनी विनामोबदला त्यांची ही जागा कार्यालया साठी वापरण्यास दिली होती.
पूढे 1994 ला उत्तर महाराष्ट्राचे पहिले विभाग संघटन मंत्री म्हणून मा. श्री विनोद तावडे यांची नियुक्ती झाल्यानंतर या जागेचे रूपांतर भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय असे झाले. श्री. विनोद तावडे, खासदार सरोदे, तत्कालीन जिल्हा अध्यक्ष एकनाथराव खडसे, जिल्हा संघटक स्व. चंद्रकांत मेंडकी, जिल्हा सरचिटणीस श्री नारायणराव चौधरी जामनेर चे तत्कालीन सरपंच असलेले श्री गिरीश महाजन, डॉ राजेंद्र फडके, ॲड. किशोर काळकर आदी मान्यवरांचा पार्टी च्या बैठकीच्या निमित्ताने नियमित राबता असायचा.
1995 च्या विधानसभा निवडणुकीतील उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या अभूतपूर्व यशाची मूहूर्तमेढच जणू या तत्कालीन विभागीय कार्यालयातून रोवली गेली असे म्हटले तर वावगे ठरू नये !
या निवडणुकी नंतर महाराष्ट्रात भाजप- सेना युती चे सरकार स्थापन झाले. जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आले. थोड्या उशिराने का होईना नाथाभाउंचा मंत्रिमंडळात एकदाचा समावेश होउन (मंत्रिमंडळात स्थान मिळण्यास उशीर का झाला याचे कारण फार वेगळे होते) यथावकाश ते पालकमंत्री झाले. आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आस लागली ती स्व- मालकीच्या भव्य जिल्हा कार्यालयाच्या वास्तू ची. लवकरात लवकर कार्यालय झाले पाहिजे असा निर्णय जिल्हा पदाधिकारींनी घेतला.
मला आठवतय, जिल्हा सरचिटणीस श्री ना. वी. चौधरी आणि मी , माझ्या छोट्या लूना मोपेड वरून भटकंती करत शहरात कितीतरी जागा पाहिल्या. नव्यानेच पार्टी च्या संपर्कात आलेल्या उद्योजक श्री सूनिल बढे यांनी ही काही जागा सूचवल्या पण ही आमची फक्त प्राथमिक चाचपणी असायची.
कूठे एरिया चांगला नसायचा तर कूठे जागा मनाजोगती नव्हती. काही जागांच्या किमती अवाच्या सव्वा होत्या. शेवटी बळीरामपेठेतील पूर्वीचा कोल्हटकरांचा वाडा म्हणून ओळखली जाणारी जागा सर्वांच्या मनात भरली ! जागा तर सर्वांनाच पसंत पडली, किंमत ही ठरली. रक्कम मोठी असल्याने सर्वांनी मिळून संपूर्ण जिल्ह्यातून निधी संकलन करण्याचे ठरवले.
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अधिवेशन जळगावमध्ये घेण्याचे जाहीर झाले. या अधिवेशनासाठी दस्तूर खूद्द अटलबिहारी वाजपेयीं उपस्थित राहणार असल्याचे समजताच जिल्हाभरात एकच उत्साह निर्माण झाला. जळगाव जिल्हा भाजप तर्फे मा. अटलजींना 51 लाखांची थैली अर्पण करण्यासाठी निधी संकलन समिती स्थापन करण्यात आली. को-या पावती पूस्तका बरोबरच रू. 5, 10 आणि 50 ची कूपन छापून त्या द्वारे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून समाजातील विविध व्यवसायिक, शेतकरी ,सर्वसामान्य नागरिक , अटलजींचे चाहते , आणि कार्यकर्ते यांच्या कडून मा. अटलजीं ना द्यावयाच्या गौरव निधी साठी ऐच्छिक निधी संकलन करण्यात आले. जी. एस. ग्राउंड ( हल्ली चे शिवतीर्थ मैदान ) वर झालेल्या अति विराट सभेत मा. अटलबिहारी वाजपेयींना 51 लाखांचा गौरव निधी अर्पण करण्यात आला. प्रथेप्रमाणे मा. वाजपेयींनी त्यांना मिळालेला तो संपूर्ण गौरव निधी पक्षकार्या साठी अर्पण केला. या रकमेतून जिल्हा भारतीय जनता पक्षाचे बळीराम पेठेतील भव्य कार्यालयाची इमारत आवश्यक ती डागडुजी व रंगरंगोटी करून उभी राहिली. महाराष्ट्रात जनसंघाची आणि त्या नंतर भाजपची संघटनात्मक बांधणी ज्यांनी मोठ्या कष्टाने केली व पक्ष उभा केला त्या स्व. वसंतराव भागवत यांची स्मृती म्हणून या वास्तू ला “वसंत स्मृती” हे नाव देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वच भाजप कार्यालयास वसंत स्मृती हेच नाव दिलेले आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते झाले होते. या उद्घाटन प्रसंगी स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मूंडे, स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष स्व. प्रा. ना. स. फरांदे आदि मान्यवर उपस्थित होते.
1995 पासून भारतीय जनता पार्टी चा जिल्ह्यातील चढता आलेख पाहता एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की, “ही” वास्तू पार्टी ला “लहणी”ठरली आहे ! एखादा अपवाद वगळता लोकसभेच्या दोन्ही जागा सातत्याने पार्टी ने जिंकल्या आहेत, विधानपरिषदेच्या जागे सह रावेर, मूक्ताईनगर, जामनेर, भूसावळ , यावल, जळगाव, चाळीसगाव आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद, सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य संख्या, अनेक पंचायत समित्या, जिल्हा बॅंक असो वा जिल्हा दूध संघ असो, बाजार समित्या , जिल्ह्यातील इतर अनेक सहकारी संस्था, नगरपालिकां मधून नगरसेवकांची लक्षणीय संख्या, नगराध्यक्ष, लोकनियूक्त नगराध्यक्ष, जळगाव महापालिकेतील स्वबळावरील सत्ता अनेक ग्रामपंचायती मधील सत्ता हे पाहिल्यानंतर, आज भाजपा हा जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
अर्थात भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत मिळालेल्या या यशात जसा वसंत स्मृती या वास्तू चा “पायगुण” आहे तसाच यात निष्ठावंत आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या रक्तातच भिनलेला पार्टी प्रती असलेला जिव्हाळ्याचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये ! पक्षाच्या अनेक बैठका,कार्यकर्त्यांची लगबग
निवडणूकांची रणनीती , नेत्यांचे दौरे, उमेदवारांच्या मुलाखती यामुळे या वास्तूतच नव्हे तर संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण असायचे.
वसंत स्मृती मध्ये प्रवेश करतानाच आपण जणू एखाद्या प्राचीन मंदिरात प्रवेश केला अशी अनुभूती येत असे. एक अनामिक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी मिळत असे.
जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे आणि यशाची शिखरे पादाक्रांत करणारे अनेक महत्वाचे राजकीय निर्णय एकेकाळी या वास्तूत घेतले गेले. 30 वर्षातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींची साक्षीदार असलेल्या या वास्तू ने अनेकांना मोठी राजकीय उंची दिली. ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेली आहे याची हूरहूर माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना आहे, पण जीर्ण झालेली ती इमारत पाडणे सूद्दा आवश्यक झाले होते.
लवकरच याच जागेवर भाजप कार्यालयाची नवी सूसज्ज, भव्य इमारत उभारण्याचे नियोजन आहे. “वसंत स्मृती” या नावाची नवी इमारत कधी उभी राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागलेली आहे. या नव्या वास्तू साठी आपला खारीचा वाटा असावा असे ही मनोमन वाटत आहे.

उदय भालेराव, जळगाव
मो. 7875558150