महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे मंगळसूत्र व रिक्षेसह १.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. संशयितांकडून २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व काळे मणी असलेले मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता फिर्यादी महिला रिक्षाने घरी जात होती. रिक्षाचालकाने तिला ‘तुम्हाला घरी सोडतो’ असे सांगून रिक्षेत बसविले. त्यानंतर रिक्षेतील अन्य दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वसीम शेखअली तेली (वय २८), अरबाज खान अज्जू खान (वय २६) आणि वसीम अजमल खान (वय २६) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयितांकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोन्याची पोत व काळे मणी असलेले मंगळसूत्र किंमत २५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा (एमएच-१९-व्ही-६६६३) किंमत १ लाख रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम शेखअली तेली याच्याविरुद्ध यापूर्वी एमआयडीसी, रामानंदनगर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तर वसीम अजमल खान याच्याविरुद्धही एमआयडीसी पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गाडीतले, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.