DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात एमडीचा साठा जप्त; ६४.४४ ग्रॅम एमडीसह एकाला अटक

जळगाव : अमली पदार्थांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाचोरा-नशिराबाद बायपास परिसरात कारवाई केली. यावेळी ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमडी व मोबाईल फोन असा एकूण २ लाख २३ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती संकलित करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जळगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाचोरा-नशिराबाद बायपास परिसरात असलेल्या एका कारमध्ये एमडी अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार आहे.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६४.४४ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ, अंदाजे किंमत १ लाख ९३ हजार ३२० रुपये, तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण २ लाख २३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२५/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीशी संबंधित अन्य संशयितांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी एमडी अमली पदार्थ बाळगणे/विक्री करणे, गांजा बाळगणे/विक्री करणे तसेच घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ३५ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गाडीतले, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.