DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चाळीसगावात ३०० बंदी क्षमतेचे खुले कारागृह

महाराष्ट्र शासनाची मंजुरी; आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे नवीन खुले कारागृह स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत गृह विभागाने शासन निर्णय जारी केला असून, त्यामुळे चाळीसगाव येथे नवीन कारागृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रस्तावित खुल्या कारागृहात बंदींसाठी बॅरेक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने तसेच आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या नव्या कारागृहामुळे भविष्यात कारागृह व्यवस्थेवरील वाढता ताण कमी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील कारागृहांमध्ये बंदींची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे नवीन कारागृह उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने नवीन खुले कारागृह स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे चाळीसगावच्या विकासात आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडणार आहे. तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

शासन निर्णयानुसार पुढील टप्प्यात कारागृहाच्या बांधकामासह आवश्यक सुविधांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. नवीन कारागृहामुळे जळगाव जिल्ह्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होणार असून, चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेच्या खुल्या कारागृहाची उभारणी करण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.