सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा उत्साहात
चित्रकला, वक्तृत्व, पथनाट्य व रांगोळी स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी गांधी उद्यान येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला, पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, रावेरचे आमदार अमोलदादा जावळे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, संतोष इंगळे, निलेश झोपे, राजू नन्नवरे, विजय वानखेडे, महिला मोर्चाच्या नीताताई परदेशी, नगरसेवक गायत्री राणे, विजय बांदल, राजू मराठे, आनंद सपकाळे, विनोद मराठे, उमेश देशपांडे, विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा महानगर संयोजक दीपक परदेशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे संयोजन पदवीधर प्रकोष्ठाचे शिरीषकुमार तायडे यांनी केले. पथनाट्य तसेच शासकीय योजनांच्या जनजागृती कार्यशाळेचे संयोजन भाजपा जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांनी केले.
सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत जळगाव शहरातील विविध विद्यालयांमधील तब्बल ४५० विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली सर्जनशीलता व वक्तृत्वकौशल्य प्रभावीपणे सादर केले.
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी कुतूहल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गोरडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले. प्रास्ताविक शिरीषकुमार तायडे यांनी केले, तर आभार भूषण लाडवंजारी यांनी मानले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित शिक्षकांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, वक्तृत्वकौशल्य, सामाजिक जाणीव तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण आणि विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.