होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा विद्यार्थ्यांना आवाहन
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आरोग्य योजनांबाबत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दि २३ नोव्हेंबर रोजी स.११ वा अक्षता पाटील सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमात गोदावरी हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातील डॉ. सौरभ मुळे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजना, मोफत उपचार सुविधा तसेच विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सर्वसामान्य नागरिकांना या योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येतो, याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.नर्सिंग अभ्यासक्रमातील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात होम व्हिजिटिंगच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती द्यावी, त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करावी आणि गरजू रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.अनेकदा माहितीच्या अभावामुळे गरजू रुग्ण शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत नर्सिंग विद्यार्थ्यांनी आरोग्यदूत म्हणून काम करत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व संबंधित विभागाचे विशेष सहकार्य लाभले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळण्यासोबतच समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात आपली भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव झाली.