मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक; २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त!
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; नऊ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस
जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या असून, या आरोपीकडून एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक MH-19-EM-2330) ही जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणावरून चोरीला गेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा व जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील बहनापूर येथील रहिवासी असलेल्या गोविंद सोबराव पाटील (वय ४५) याला ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने जळगाव शहरातून आठ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोटारसायकल चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडून एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या. या वाहनांची एकूण किंमत २ लाख ३२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस
या कारवाईत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ, तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा एकूण नऊ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. संबंधित गुन्ह्यांची नोंद भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक संचार पिंगी तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस अंमलदार अतुल बंजारी, पोलीस अंमलदार चेतन वंजारी, पोलीस अंमलदार किशोर पाटील, पोलीस अंमलदार छगन तायडे, पोलीस अंमलदार राहुल गवई, पोलीस अंमलदार रवींद्र काकुडे, पोलीस अंमलदार रिजवान शेख, पोलीस अंमलदार विकास पवार, पोलीस अंमलदार हर्षल महाजन, पोलीस अंमलदार गौरव पाटील आणि पोलीस अंमलदार मिलिंद जाधव यांनी कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.