DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा!

एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यांतील मतदारांच्या मेळाव्यात नामदार गिरीश महाजन यांचे आवाहन

एरंडोल –  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार पॅनल लढवत असलेल्या सर्व जागांवर विजय मिळवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन नामदार गिरीश महाजन यांनी केले. एरंडोल येथे आयोजित एरंडोल, धरणगाव आणि पारोळा या तीन तालुक्यांतील मतदार प्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते.
सहकार पॅनलला ९० टक्के मते मिळावीत, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली. ‘कपबशी’ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदार प्रतिनिधींना केले.
दूध संघाप्रमाणे जिल्हा बँकेलाही नफ्यात आणण्याचा निर्धार
जिल्हा दूध संघाच्या वाटचालीचा दाखला देताना महाजन म्हणाले, “आपण सर्वांनी मिळून जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवली. त्या वेळी संघ तोट्यात होता. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण दूध संघाला नफ्यात आणले. जिल्ह्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत. आता त्याच एकजुटीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही नफ्यात आणायचे आहे.”
भागपूर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, येत्या तीन वर्षांत जिल्ह्यातील उर्वरित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारही महाजन यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात अधिकाधिक पाणी अडवून त्याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी गिरणा धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन सोडण्याची मागणी केली.
मेळाव्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार अमोल चिमणराव पाटील, खासदार स्मिता वाघ, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, संजय पवार, विष्णू भंगाळे, उमेश नेमाडे, समाधान महाजन, रावसाहेब पाटील आणि वासुदेव पाटील आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार पॅनलचे सर्व उमेदवारही मेळाव्यास उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.