रस्ते डागडुजी व लोंबकळणाऱ्या केबल्स हटविण्याचे निर्देश
रथोत्सव मार्गाची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी
जळगाव : जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेल्या रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. १७) संपूर्ण रथोत्सव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. श्रीराम मंदिर संस्थानपासून जुने जळगाव परिसरातील विविध गल्ल्यांमधून जिथून रथ धावणार आहे, त्या सर्व मार्गांची त्यांनी बारकाईने तपासणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान रस्त्याच्या मधोमध किंवा रथाच्या मार्गाला अडथळा ठरणाऱ्या सर्व विद्युत केबल्स तात्काळ बाजूला करण्याचे निर्देश महापौर काळे यांनी विद्युत विभागाला दिले. तसेच, या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रस्ते वाहतुकीस व रथोत्सवास योग्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच रथोत्सव काळात नागरिकांना व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक कल्पेश सोनवणे, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.