लोकतंत्र सेनानी संघाचा १९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कुटुंब मेळावा
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती; मिसाबंदी, सत्याग्रही व त्यांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव : आणीबाणीच्या काळात मिसाबंदी म्हणून कारावास भोगलेले तसेच सत्याग्रहात सहभागी झालेले लोकतंत्र सेनानी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्हास्तरीय मेळावा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा लोकतंत्र सेनानी संघाच्या वतीने हा मेळावा जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाहूनगर हौसिंग सोसायटीच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा मिसाबंदी प्रकाशजी जावडेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दीक्षित आणि प्रदेश सचिव श्रीपादराव ओगले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या मेळाव्यात आणीबाणीच्या काळातील संघर्ष, लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेले योगदान आणि लोकतंत्र सेनानींच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व मिसाबंदी, सत्याग्रही तसेच त्यांच्या वारसांनी या मेळाव्याला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुळकर्णी यांनी केले आहे.