DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू!

मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही बसला विजेचा धक्का; असोदा रोड परिसरातील हृदयद्रावक घटना

जळगाव : घरामागील वायर कट करताना विजेचा धक्का बसलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी असोदा रोड परिसरात घडली. या दुर्घटनेत आई आणि मुलगा अशा दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड, जळगाव) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी राहुल सपकाळे हा घराच्या मागील बाजूस असलेली तुटलेली किंवा खुली वायर कट करण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने तो गंभीर अवस्थेत पडला. मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच आई सुनंदा यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. माय-लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि परिचितांनी गर्दी केली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
एकाच वेळी पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाल्याने राजू सपकाळे यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे सपकाळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून असोदा रोड परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.