जिल्हा बँकेत महायुतीचे वर्चस्व; १२ जागा बिनविरोध
शिंदे गटाची बाजी; भाजपचे चार, तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडीच्या माध्यमातून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीच्या वाट्याला आलेल्या २१ जागांपैकी तब्बल १२ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने सहा जागा मिळवत आघाडी घेतली असून भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रित रणनीती आखल्याने अनेक जागांवरील निवडी बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे.
शिंदे गटाचे सर्वाधिक सहा उमेदवार
बिनविरोध निवडीमध्ये शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक सहा जागांवर बाजी मारली. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह सुमित किशोर पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील आणि सोमसिंग खुमानसिंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सहा जागांमुळे जिल्हा बँकेतील शिंदे गटाचे प्रतिनिधित्व भक्कम झाले आहे.

भाजपच्या चार उमेदवारांची वर्णी
भाजपनेही चार जागांवर बिनविरोध निवड मिळवली आहे. मंत्री गिरीश महाजन, रोहित निकम, रजनी सावकारे आणि मधुकर राणे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे महायुतीतील भाजपचेही जिल्हा बँकेतील स्थान निश्चित झाले आहे.
अजित पवार गटाला दोन जागा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. सोनल संजय पवार आणि जयश्री अनिल पाटील या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे.
उर्वरित नऊ जागांसाठी उत्सुकता
महायुतीच्या २१ जागांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित नऊ जागांवरील निवडणुकीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या जागांवर कोण बाजी मारणार आणि जिल्हा बँकेच्या सत्तेचे अंतिम समीकरण कसे असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महायुतीने सुरुवातीलाच १२ जागांवर बिनविरोध यश मिळविल्याने निवडणुकीत आघाडी घेतली असली, तरी उर्वरित जागांचे निकाल अंतिम सत्तासमीकरण निश्चित करणार आहेत.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
शिवसेना शिंदे गट (६)
१. गुलाबराव पाटील
२. चंद्रकांत सोनवणे
३. सुमित किशोर पाटील
४. मृणाल अमोल पाटील
५. नलिनी चिमणराव पाटील
६. सोमसिंग खुमानसिंग पाटील
भाजप (४)
१. गिरीश महाजन
२. रोहित निकम
३. रजनी सावकारे
४. मधुकर राणे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (२)
१. सोनल संजय पवार
२. जयश्री अनिल पाटील