१५४ वर्षांची परंपरा लाभलेला जळगावचा श्रीराम रथोत्सव आज; शहरात भक्तिमय उत्साहाचे वातावरण
जळगाव : तब्बल १५४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला जळगावचे ग्रामदैवत श्रीराम रथोत्सव शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पारंपरिक रथोत्सवासाठी श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरातून भव्य रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. रथोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ७ वाजता काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता श्रीराम प्रभूंचा महाअभिषेक, तर ७.३० ते ८.३० या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी १०.३० वाजता श्रीराम रथाचे महापूजन करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त तथा विद्यमान गादीपती ह.भ.प. मोहन महाराज जोशी यांच्या हस्ते रथपूजन होणार आहे.
सनई-चौघड्यांच्या निनादात निघणार रथयात्रा
सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरातून पारंपरिक रथयात्रेला सुरुवात होईल. विविध वाद्यपथकांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात श्रीरामाचा भव्य रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. १५४ वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या रथोत्सवाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

असा असेल रथयात्रेचा मार्ग
श्रीराम मंदिरातून निघालेली रथयात्रा वाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, वीर माणिक गल्ली, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दगडू बाजार, जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, शिवाजी रोड, नेहरू ब्रदर्स, घाणेकर चौक आणि गांधी मार्केट मार्गे श्री बालाजी मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. श्री बालाजी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक मार्गाने रथयात्रेचे मार्गक्रमण होणार आहे. जळगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक असलेल्या श्रीराम रथोत्सवासाठी शहरातील रामभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.