DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नेरी नाका स्मशानभूमीत अघोरीचा थरार!

चितेजवळ नारळ, लिंबू, अंडे : सीसीटीव्हीतील प्रकार पाहून नातेवाईकांचा संताप

जळगाव : शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेजवळ अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले असून, संबंधित प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर येत आहे. स्मशानभूमीत अशा प्रकारचे कृत्य घडल्याने नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तुकारामवाडी परिसरात राहणारे अनिल तुळशीराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. सोमवार दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नेरी नाका येथील स्मशानभूमीत हिंदू परंपरेनुसार आणि विधिवत पद्धतीने अनिल चौधरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार विधी पार पडला. मात्र, अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही तासांतच एक धक्कादायक प्रकार समोर आला. सोमवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या दरम्यान अनिल चौधरी यांचे पुतणे रवींद्र चौधरी हे स्मशानभूमीत पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वेगळ्याच वस्तू आढळून आल्या. चितेजवळ नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वस्तू पाहून त्यांना अघोरी पूजा किंवा विधी करण्यात आल्याचा संशय आला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे, एक संबंधित व्यक्तीच्या हातात काही संशयास्पद वस्तू दिसत आहेत. त्याच्या हातात नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती अशा वस्तू दिसत आहेत. जिथे व्यक्तीच्या चितेला अग्नीडाग दिला जातो, त्या ठिकाणी तो जाताना दिसत आहे. जिथे व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात, तिथे तो व्यक्ती ह्या सर्व वस्तू ठेवताना दिसत आहे. या फुटेजमुळे अघोरी विधीच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले असून, या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अंत्यसंस्कारानंतर अशा पद्धतीने विधी करणे आणि स्मशानभूमीचे पावित्र्य भंग करणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पोलिसात तक्रार देणार!
दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती अनिल चौधरी यांचे पुतणे रवींद्र चौधरी यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.