२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत
जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ, व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. ६ जानेवारी रोजी उद्गाटन समारंभानंतर प्रथम सत्रात तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक असे कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड ने होणार आहे. द्वितीय सत्र तरूण व आश्वासक व बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे सौरव व गौरव मिश्रा यांच्या कथक जुगलबंदिने संपन्न होणार आहे. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान करतील.
द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र सहगायनाने संपन्न होणार आहे. शास्त्रीय व उप-शास्त्रीय सहगायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील मुंबई चे गायक व गुरु पं. डॉ. राम देशपांडे, व त्यांचा मुलगा गंधार देशपांडे. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.
बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून ही मैफल सजवणार आहेत पद्मभूषण व ग्रॅमी ऍवार्ड विजेते पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा) पं. सलील भट (सात्विक वीणा) व अथर्व भट (गिटार) यांच्या सहवादनाने एकविसावा महोत्सव संपन्न होणार आहे.
तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या महोत्सवाच्या तीनही दिवसांचे सुत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी दिप्ती भागवत करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, तसेच विविध प्रायोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर, विश्वस्त अशोकभाऊ जैन, रमेशदादा जैन, दत्ता सोमण, प्रा. शरदचंद्र छापेकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे व डॉ. अपर्णा भट यांनी केले आहे. प्रवेशिकेसाठी रसिकांनी दीपिका चांदोरकर भ्रमणध्वनी – ९८२३०७७२७७ किंवा ०२५७-२२२७७२२ वर संपर्क करावा अशी विनंती प्रतिष्ठानाने केलेली आहे.