DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी केली महिलेसह एकाला अटक

जळगाव : प्रतिनिधी

खऱ्या नोटाच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या माहितीनुसार भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह, एक महिलेसह एका पुरूषाला अटक केली आहे. महिलेचा या प्रकारात सहभाग असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहनाज अमीन भोईटे वय रा. साकेगाव ता.भुसावळ व हनीफ अहमद शरीफ ( वय ५५) रा. लाखोली, नाचणखेडा ता.जामनेर अशी अटकेतील दोघांची नावे आहे.

साकेगाव येथे शहनाज अमीन ऊर्फ शन्नो नावाची महिला तिच्या राहत्या घरातून खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा चलनात वितरीत करण्यासाठी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ तालुक्याचे पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या. त्यानंतर या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात शहनाज या महिलेला अतिशय गोपनीय पध्दतीत माहिती काढून अटक करण्यात आली. तिने दिलेल्या जबाबावरून बनावट नोटांच्या प्रकरणात जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील हनीफ पटेल  याला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर फुसे यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून या दोघांनी मोठ्याप्रमाणावर बनावट नोटा चलनात वितरीत केल्याचाही पोलिसांचा अंदाज आहे. याच दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार हे करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.