भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, जिल्हाधिकारी काय म्हणाले?
भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र भुसावळ हे असून भूकंपाचे धक्के लगतच्या 50 किलोमीटर क्षेत्रात जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी आज दि. २७ शुक्रवारी रोजी पत्रकार परीषदेत दिली आहे.
तसेच आपत्तीव्यवस्थापन यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून नागरीकांनी सोशल मिडीयावरील कुठल्याही अफवांना बळी पडू नये, तसे कुठल्याही बातमीची अधिकृत खातरजमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भूकंपाच्या धक्क्याने कुठेही जिवीत वा वित्तहानी झाल्याचे वृत्त आले नसल्याचे सांगून त्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेशही दिले आहे. दरम्यान, भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रेक्टर स्केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली. शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्के बसल्याचे नागरीकांनी सांगितले. शहरात या चर्चेला उधाण आले होते.
जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?
घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.
जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?
पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका.उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.
भूकंपादरम्यान काय करावे ?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.
भूकंपानंतर काय करावे ?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.