जगवानी नगरातील वृद्धाचा तलावात बुडाल्याने मृत्यू
जळगाव : जगवानीनगर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जगवानीनगर येथे बबन पवार हे पोलिस असलेल्या मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी ते घराबाहेर निघाले होते. दरम्यान, रात्री त्यांचा मेहरूण तलाव येथे बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी काही लोक आले होते. त्यांना पवार यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी ही बाब लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविली. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील विकास सातदिवे, नितीन पाटील, समाधान टहाकळे,इमरान बेग, सुनील सोनार यांच्यासह काही होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मेहरूण तलाव गाठले. त्यानंतर पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. नंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
मुलाने ओळखला वडिलांचा मृतदेह….
मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकायांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी पवार यांच्या अंगाची झडती घेतली. त्यांच्या खिशात काही कागदपत्रे आढळून आली. त्यावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नातेवाइकांचा तपास लागला, नंतर मुलगा विकास याला संपर्क साधून त्यास जिल्हा रुग्णालयात बोलवून घेण्यात आले. मुलाने जिल्हा रुग्णालयात येताच वडिलांचा मृतदेह ओळखला आणि हंबरडा फोडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास विकास सातदिवे व समाधान टाहकळे करीत आहेत.