शरद पवारांची आज जळगावात स्वाभिमान सभा
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावातील सागर पार्क येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहील असा अंदाज घेऊन भव्य मंडप आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळाची सोमवारी सायंकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पहाणी केली तसेच या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राज्यभर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येवला आणि बीडची सभा गाजल्यानंतर जळगावात ही भव्य सभा होत आहे. या सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेत काही माजी खासदार, आमदार यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश होण्याचीही शक्यता आहे.
पक्ष आणि चिन्हापेक्षा अख्खा महाराष्ट्र पवारसाहेबांसोबत : रोहीत पवार
चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे पवार साहेब आहेत. तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवार साहेबांसोबत राहून लढणार आहे. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितले नव्हते तर शरद पवार साहेबांकडे बघितले होतं.