DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

“हिंद-दी-चादर” श्रीगुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

जळगाव : cनवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च,2026 रोजी ‘हिंद दी चादर श्रीगुरु तेग बहादूर साहिब जी यांचा 350 व्या शहिदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार व प्रसिध्दी करावी, तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.श्रीमंत हारकर यांनी केले.

नवी मुंबई खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च,2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी भव्य  कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन व योगदानाबाबत अपर जिल्हाधिकारी डॉ.हारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलंदे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहूल इधे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अपर जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमासंदर्भात शासन स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची व नियोजनाची माहिती दिली. नवी मुंबई खारघर येथे कार्यक्रमाला जिल्हयातील विविध तालुक्यातून, गावातून नागरिकांना, भाविकांना कार्यक्रमास जाण्यासाठी व परत येण्याची व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, तालुकास्तरावरुन विविध सामाजीक संघटनांच्या मदतीने बसेसची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी बैठकीत नमूद केले.

अपर जिल्हाधिकारी डॉ.हारकर म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात. ग्रामपंचायत तसेच नगरपालिका विभागांनी स्वच्छता मोहीम राबवावी. ग्रामपंचायतींमध्ये लाऊड स्पीकरवरुन सरताजचे गीत वाजवावे. चित्रपटगृहांमधूनही या गीताद्वारे कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करावी. प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दी करावी. आरोग्य विभागाने गावा-गावात आरोग्य तपासणी शिबिरे राबवावीत.

कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीसाठी प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने शहरामध्ये कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी चित्ररथ, हार्डिग्जव्दारे जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

देशातून तसेच राज्यातून अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व सेवाभावी संस्था, युवक-युवती व विविध समाज घटकांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केल्यास हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी डॉ.हारकर यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीस शीख, शिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदाय या नऊ समाजांचे प्रतिनिधी, आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.