विद्यापीठात पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत क्लास १०००० क्लिन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डीव्हायसेस फॅब्रिकेशनच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात आज सोमवार दि. १६ ऑक्टोबर रोजी झाली.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे हे अध्यक्षस्थानी होते तर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सांगितले की, क्लास १०,००० क्लिन रूम या अद्ययावत प्रयोगशाळा निर्मितीमुळे या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व ज्ञान प्रशिक्षण वर्गाव्दारे सगळीकडे देता येईल. या तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन केले. प्रास्ताविक करतांना प्रशाळेचे संचालक प्रा. ए. एम. महाजन यांनी देशपातळीवर सेमीकंडक्टर चिप्स निर्मिती या उद्योगाचे महत्व असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणात पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी प्रा. भुषण चौधरी, प्रा. विकास गिते, डॉ. जसपाल बंगे, श्री. मोहिनीराज नेतकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. डी. जे. शिराळे यांनी मानले.