DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राम मंदिर उद्घाटनाच्या पत्रिका घेऊन महाराष्ट्रातील घराघरात जाणार – विश्व हिंदू परिषद

मुंबई : अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच श्रीप्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातून मान्यवर आणि साधूसंत उपस्थित राहणार आहेत; मात्र या कार्यक्रमाला इतर नागरिकांनीही उपस्थित राहावं आणि देशभरात एक वातावरण निर्माण व्हावं यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं संकल्प करण्यात येणार आहे.

काय आहे विश्व हिंदू परिषदेचा संकल्प – विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं येत्या 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राज्यातल्या सुमारे 75 लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तसंच कोकण प्रांतातील 40 लाख घरांपर्यंत पोहोचणार आहोत, अशी माहिती कोकण प्रांत विश्व हिंदू परिषदेचे सचिव मोहन सालेकर यांनी दिली आहे. देशातील प्रत्येक रामभक्ताला या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची निश्चितच इच्छा असणार; मात्र प्रत्येक जण या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे या निमित्तानं राज्यातील 75 लाख घरांपर्यंत या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका आणि अयोध्या राम मंदिरात मंत्रित केलेल्या अक्षता या कुटुंबांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत. त्यासाठी 40 हजार कार्यकर्ते 1 ते 15 जानेवारी दरम्यान या कुटुंबांशी संपर्क साधतील, असंही सालेकर यांनी सांगितलं.

22 जानेवारीला राम नाम जप : राज्यातील लाखो लोक या कार्यक्रमाला प्रत्यक्ष पोहोचू शकले नाही तरी नागरिकांनी आपापल्या परिसरातील मंदिरामध्ये जाऊन दहा ते एक या दरम्यान राम नामाचा जप करायचा आहे. तसंच अयोध्येत होणारा सोहळा प्रत्यक्ष पाहता येईल आणि रामनामाचा जप करता येईल. यासाठी सुमारे सव्वा लाख मंदिरांमध्ये स्क्रिन लावण्याचा संकल्प असल्याचंही सालेकर यांनी सांगितलं; मात्र हे स्क्रिन विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं नव्हे तर रामभक्तांनी स्वतःच्या खर्चातून आनंदासाठी लावले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विश्व हिंदू परिषदेच्यावतीनं दर्शनाची सोय : जानेवारीच्या 22 तारखेला जे लोक जाऊ शकणार नाही; मात्र अशा अनेक कुटुंबांची अथवा नागरिकांची दर्शनाला जायची इच्छा असेल, त्यांनी विश्व हिंदू परिषदेकडे आपली नोंदणी करावी. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं भक्तांची एक दिवसाची निवासाची व्यवस्था करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.