“शब्द पाळणारच, पण योग्य वेळी” – फडणवीसांची कर्जमाफीवर प्रतिक्रिया
पुणे | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळेला घेतला जाईल. सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवलेला नाही.”
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावर प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीसाठी काही नियम व प्रक्रिया आहेत, ती योग्य वेळी पूर्ण करून निर्णय घेतला जाईल.“
इतर महत्त्वाचे मुद्दे :
🔸 योग दिन विशेष कार्यक्रम :
योग दिनानिमित्त एकाच वेळी ७०० ठिकाणी योग सत्र पार पडले. “योगाला जगभर नेण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे,” असंही फडणवीस म्हणाले.
🔸 आळंदीत कत्तलखान्यावर बंदी कायम :
“आळंदीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
🔸 माध्यमांना वागणूक प्रकरण :
आळंदीत वारीदरम्यान माध्यमांना झालेल्या गैरवर्तनावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “आनंदवारीत अशा घटना होऊ नयेत यासाठी चर्चा करू. तुम्हीही मनावर घेऊ नका.”
🔸 पावसाचे नियोजन व जलव्यवस्थापन :
“राज्याच्या धरणांतील पाणीस्तर व विसर्गावर सतत लक्ष आहे. शेजारील राज्यांशीही योग्य संवाद सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
🔸 विद्यापीठाचे यश :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यशाबद्दल फडणवीसांनी अभिनंदन केले. “विद्यापीठ लवकरच भरती प्रक्रिया सुरू करेल,” अशी माहिती त्यांनी दिली.