सेवेत निष्काळजीपणा; ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान निलंबित
जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेत हलगर्जीपणा आणि कार्यातील निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमजद खान हे वैद्यकीय देयकांचे कार्य पाहत होते. त्यांनी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी देयक सादर केले. तसेच संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न करणे आणि अपूर्ण ठेवणे असे अनेक गंभीर त्रुटी त्यांच्या कार्यात आढळून आल्या.

नियमबाह्य वर्तन आणि प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर, शिस्तभंगात्मक कारवाईचा भाग म्हणून त्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले.
या प्रकरणाबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि शिस्त ही अत्यावश्यक आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही.” या निर्णयातून जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यनिष्ठा आणि शिस्तपालनाचा स्पष्ट संदेश दिला आहे.