DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार

जळगाव – थंडीची प्रतीक्षा करणाऱ्या जळगावकरांना अखेर थंडीची जाणीव होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जळगावात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. शनिवारी धुळे नंतर जळगाव सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. त्या दिवशी जळगावचे किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस इतके होते. परिणामी शहरात गारठा पसरला असून, येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उत्तरेकडील थंड वारे मध्य भारत आणि महाराष्ट्राकडे सरकू लागल्यामुळे राज्यभर तापमानात झपाट्याने घट झाली आहे. कमाल तापमान हळूहळू कमी होत असून, शनिवारी अनेक जिल्ह्यांत किमान आणि कमाल तापमानात घसरण नोंदवली गेली. धुळे येथे राज्यातील नीचांकी म्हणजेच १०.४ अंश तापमानाची नोंद झाली, तर जळगाव येथे १०.८ अंश तापमान होते — जे सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी कमी आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, येणारा आठवडा राज्यासाठी अधिक थंड असेल. रविवारपासून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर आणि उत्तर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी खाली जाऊ शकते. तर विदर्भ भागातही सुमारे २ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

गारठा वाढण्यामागची कारणे
पश्चिम हिमालयात झालेल्या नव्या बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील प्रदेशात थंड वारे निर्माण झाले आहेत. हेच थंड वारे मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. तसेच, रात्रीचे निरभ्र आकाश असल्याने रेडिएशनल कूलिंग वाढले आहे. याशिवाय ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे, तर दक्षिण कर्नाटकातही सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे राज्यात गारठा अधिक जाणवू लागला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.