महायुतीत फूट? नगरपरीषद निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा!
जळगाव : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीत एकत्र लढण्याचा प्रारंभीचा सूर आता मंदावला असून तिन्ही सत्ताधारी पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीच्या ऐक्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय जनता पार्टीने सर्वप्रथम आपले स्वतंत्र रणनिती आखली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे, तसेच केंद्रातील राज्यमंत्री रक्षा खडसे हे आपल्या प्रभावक्षेत्रात कार्यकर्त्यांना गती देत आहेत. त्यांच्यासोबत आ. अमोल जावळे, मंगेश चव्हाण, आणि राजूमामा भोळे हे देखील स्वतंत्र संघटनात्मक तयारीत व्यस्त असल्याचे सूत्रांकडून कळते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री ना. माणिकराव ठाकरे यांनी नुकत्याच जळगाव आणि भुसावळ येथे घेतलेल्या मेळाव्यांमध्ये स्पष्टपणे “स्वबळावर लढू” असा संदेश दिला. त्यामुळे दादागटानेही निवडणूक तयारीला वेग दिला आहे.
महायुतीतील तिसरा घटक असलेल्या शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मात्र एकत्रित लढतीसाठी प्रयत्नशील आहेत. तथापि, भाजप आणि अजित पवार गटाकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिंदेसेनाही अखेरीस स्वबळावरच रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनीही आपापल्या क्षेत्रात स्वबळावर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील हे अमळनेरमध्ये स्वतंत्र उमेदवारीची हालचाल करत आहेत.
या सर्व हालचालींमुळे “महायुती” ही संकल्पना प्रत्यक्षात फक्त कागदावरच उरते की काय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत चर्चेनंतर युतीचा गाठोडा पुन्हा बांधले जाईल की प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवरच मैदानात उतरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.