DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव महापालिकेत दुबार मतदार शोध मोहीम गतीमान; १९ पथकांकडे जबाबदारी

जळगाव : शहरातील मतदार यादीत तब्बल ३३ हजार दुबार नोंदी आढळून आल्या असून त्यापैकी सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदारांची ओळख पटवून त्यांनी कोणत्या प्रभागात मतदान करणार, याबाबतची हमीपत्रे घेण्याची मोहीम महापालिकेतर्फे ८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी १९ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत दुबार नोंदींना विशेष चिन्ह लावण्यात आले आहे. दुबार नावे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे काम आता पथकांकडून हाती घेतले जाणार आहे. या मोहिमेसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त निर्मला गायकवाड, नगररचना सहायक संचालक राजेश महाले आणि मुख्य लेखा परीक्षक विजयकुमार सोनवणे यांची नियुक्ती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आदेशाद्वारे केली आहे.

हरकतींच्या निपटाऱ्याला वेग
प्रारूप मतदार यादीवर १८,७५६ हरकती आणि तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. त्यापैकी अंदाजे साडेआठ हजार अर्जांवर स्थळ पाहणी व कागदपत्र छाननीचे काम पूर्णत्वास जात आहे. महापालिकेला १० डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची असल्याने संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.