अयोध्येला जाताना भीषण अपघात!
भाविकांच्या बसला ट्रेलरची धडक, एकाचा मृत्यू तर ३० जखमी
धरणगाव : अयोध्येहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर शनिवार पहाटे काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांची बस उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे सुमारे ४ वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, कल्याणे होळ येथील सुमारे ४० भाविक रामलल्लाचे दर्शन घेऊन बसने प्रयागराजकडे निघाले होते. सुलतानपूरच्या कुरेभर चौकाजवळ समोरून येणाऱ्या अनियंत्रित ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस व ट्रेलर दोन्ही उलटले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

जखमींना कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच जळगाव व धरणगाव प्रशासनाने तात्काळ समन्वय साधण्यास सुरुवात केली. सर्व भाविकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिक प्रशासनाशी सतत संवाद ठेवला जात आहे. घटनेमुळे कल्याणे होळ गावात शोककळा पसरली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.