DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तिरुपती मंदिरातील बनावट तूप घोटाळ्यानंतर आता ‘हा’ नवा घोटाळा उघड

तिरुपती : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानम् (TTD) मंदिर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या छायेत आले आहे. यापूर्वी प्रसादामधील लाडूंसाठी ‘नकली तुपा’च्या वापरावरून गदारोळ झाल्यानंतर आता मंदिर परिसरात येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या रेशमी शालींमध्ये ‘भेसळ’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
टीटीडी बोर्डाने केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे की, सुमारे 55 कोटी रुपयांच्या ऑर्डरमध्ये खरेदी केलेल्या 21,600 शाली शुद्ध रेशमाऐवजी मोठ्या प्रमाणावर पॉलिएस्टरपासून बनवल्या गेल्या होत्या.
शालेच्या गुणवत्तेबद्दल शंका आल्यानंतर टीटीडीच्या दक्षता विभागाने तातडीने कारवाई करत या शाली सेंट्रल सिल्क बोर्डाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या. प्रयोगशाळेच्या अहवालातून हे स्पष्ट झाले की शालींमध्ये शुद्ध रेशमाचा वापर झालेला नाही, तर पॉलिएस्टरचे प्रमाण लक्षणीय आहे.
टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितले की, दक्षता विभागाच्या तपासणीत चित्तूर जिल्ह्यातील नागरी येथील मेसर्स व्हीआरएस एक्सपोर्ट या कंपनीचा सहभाग आढळला आहे. रेशमी शाल खरेदीच्या नियमांनुसार, शाली पूर्णपणे शुद्ध तुतीच्या रेशमापासून विणलेल्या असाव्यात आणि त्यावर सिल्क मार्क संस्थेचे प्रमाणित लेबल असणे आवश्यक आहे. मात्र, पुरवठादार कंपनीने या नियमांचे सरळ उल्लंघन केले आहे. हा टेंडरच्या अटींचा भंग आणि फसवणुकीचा प्रकार असल्याने, टीटीडी बोर्डाने पुरवठादार कंपनी मेसर्स व्हीआरएस एक्सपोर्ट आणि तिच्या दोन सहयोगी कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसीबी (ACB) मार्फत तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी ‘नकली तूप’ घोटाळा गाजला होता
या ‘नकली शाल’ घोटाळ्यापूर्वी, 2019 ते 2024 दरम्यान तिरुमाला मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ झाल्याचा आरोप झाला होता. एका बंदी घातलेल्या डेयरी कंपनीने हे नकली तूप पुरवले होते, ज्याचा वापर लाडू बनवण्यासाठी केला गेला होता. हा प्रकार तेव्हा खूप चर्चेत राहिला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, मंदिर प्रशासनाच्या कारभारावर आणि कंत्राटदारांच्या निवडीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.