DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आश्वासित प्रगती योजनेच्या नावाखाली २ हजारांची लाच मागणी

नगरपरिषदेतील शिपायावर कारवाई

अमळनेर – नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका शिपायाविरुद्ध लाचमागणीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, आश्वासित प्रगती योजना तसेच वेतन निश्चितीचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत कर्मचारी आहेत. सेवाकालानुसार १०, २० व ३० वर्षांनंतर मिळणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा हप्ता अद्याप मंजूर न झाल्याने त्यांनी आवश्यक प्रक्रियेबाबत चौकशी करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील आस्थापना विभागात कार्यरत शिपाई मनोज साहेबराव निकुंभ यांच्याशी संपर्क साधला.

या वेळी आरोपी लोकसेवक मनोज निकुंभ यांनी आश्वासित प्रगती योजना, वेतन निश्चितीचा लाभ तसेच मुख्याधिकाऱ्यांची मंजुरी मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या लाचमागणीप्रकरणी तक्रारदारांनी दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष लाचमागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले.

दरम्यान, तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी गेले असता आरोपीने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. तथापि, लाचमागणी सिद्ध झाल्याने अमळनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद गुन्हा क्रमांक ५१९/२०२५ नुसार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आरोपी मनोज निकुंभ यांच्याविरुद्ध सन २०१९ मध्येही भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचमागणीचा प्रकार समोर आल्याने नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी पर्यवेक्षण केले असून, सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथील पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.