नवीन वीज मीटर जोडणीच्या नावाखाली लाचखोरी, वरिष्ठ तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात
जळगाव – नवीन वीज मीटर जोडणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.४४ वाजता जळगाव शहरातील तापडीया क्लिनिक येथे करण्यात आली. या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा क्रमांक ९०६/२०२५ नोंदवण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आत्माराम धना लोंढे (वय ५७ वर्षे), व्यवसाय – वरिष्ठ तंत्रज्ञ (महावितरण), रा. सागर टेन्ट हाऊसच्या पाठीमागे, हरी विठ्ठल नगर, जळगाव असे आहे. तक्रारदार यांच्या प्लॉट क्रमांक १, ईश्वर कॉलनी, गणेशवाडी, जळगाव येथे असलेल्या राहत्या घरासाठी त्यांच्या मुलाच्या नावाने नवीन वीज मीटर कनेक्शन घेण्यासाठी तक्रारदार यांनी दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आदर्श नगर विभागातील वायरमन आत्माराम लोंढे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर काम करून देण्यासाठी आरोपीने ४,००० रुपये स्वीकारले होते. मात्र, त्यानंतरही वीज मीटर जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले नव्हते. यानंतर तक्रारदारांनी पुन्हा विचारणा केली असता आरोपीने उर्वरित कामासाठी आणखी २,००० रुपयांची लाच मागणी केली. याबाबत कंटाळून तक्रारदार यांनी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ACB कडून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपी आत्माराम लोंढे याने तक्रारदाराकडून २,००० रुपये लाच रक्कम तापडीया क्लिनिक येथे पंच क्रमांक १ यांच्या समक्ष स्वीकारताच ACB पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीस दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.०० वाजता अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
