DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांना चांगला प्रतिसाद

दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४६.५३ टक्के मतदान; यावलमध्ये सर्वाधिक टक्का

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी शनिवारी (दि. २० डिसेंबर २०२५) शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला असून दिवसभरात संमिश्र पण समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील वरणगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, सावदा आणि यावल या सहा नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा मंद होता; मात्र दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढताना दिसून आली.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार यावल नगरपरिषदेत सर्वाधिक ६७.३६ टक्के मतदान झाले आहे. सावदा येथे ५७.५६ टक्के, वरणगाव येथे ४९.६९ टक्के, पाचोरा येथे ४६.९९ टक्के, अमळनेर येथे ४६.५० टक्के, तर भुसावळ येथे ३२.८४ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. भुसावळमध्ये तुलनेने कमी प्रतिसाद दिसून येत आहे.

वेळेनुसार पाहता सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत सरासरी ४.२६ टक्के मतदान झाले होते. ११.३० वाजेपर्यंत हा आकडा १४.५७ टक्क्यांवर पोहोचला, तर दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.७५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग समाधानकारक असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.