DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महायुतीतील जागावाटपावर आज चर्चा होण्याची शक्यता

जळगाव : नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर २३ डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने येत्या तीन दिवसांत महायुतीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना फोनद्वारे बैठकीचे निमंत्रण दिले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीतील जागावाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी तीनही पक्षांतर्गत स्वतंत्र बैठका पार पडल्या आहेत. भाजपकडून ५५ ते ५७ जागा लढवण्याचा आग्रह धरला जात असून, भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने मित्रपक्षांशिवायही सत्ता स्थापन होऊ शकते, असा दावाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, भाजपच्या सूत्रांनुसार शिवसेनेला सुमारे १७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेना नेत्यांकडून अधिक जागांसाठी ठाम भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ ते ३८ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक जागांवर विजय मिळवू शकतील असे सक्षम उमेदवार तयार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाबाबत होणारी चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांचे आदेश यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.